श्री बल्लाळेश्वराची कथा

फार प्राचीन काळी, म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन 'बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले' अशी तक्रार करू लागले.
आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, 'येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला.' असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.
थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. ''हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस… ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.'
बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, ''तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.''
तेव्हा बल्लाळ म्हणाला – ''तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करावयास. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.''
तेव्हा गणेश म्हणाला – ''तुझ्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.'' असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शीला आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.

पाली

श्री बल्लाळेश्वर

श्री बल्लाळेश्वर
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.
पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील
चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment