मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे नाव का मिळाले
यासंबंधी मुद्गल पुराणातील सहाव्या खंडात एक कथा आहे ती अशी..
फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी
नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र
झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधुनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर
मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास
मिळावे असे त्याला वाटले. मग त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर
त्याने स्वारी केली. इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला;
तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरु केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव
करता येईना. सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला
गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक व कैलास यांवरही
स्वारी करण्याचे ठरवले. सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकले.
तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी गणेशाची
आराधना सुरु केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिले.
मीलवकरचपार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधूच्या
जाचातून सुटका करीन.
सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरूपर्वतावर राहत होते.
पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेशमूर्ती
सजीव झाली. ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली, ''आई, मी तुझा पुत्र
होऊन आलो आहे.' याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, 'सिंधुराजा, तुझ्या
नाशासाठी अवतार झाला आहे.''
गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले.
गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला. त्याने कमलासुराचा वध केला.
कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराच्या मस्तकाचा
भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजेच मोरगाव क्षेत्र. मग गणेशाने सिंधू राजाचा
पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली. तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या
मूर्तीची स्थापना केली. मोरावर बसून गणेशाने दैत्यसंहार केला, म्हणून
त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरगाव असे नाव
मिळाले.
मोरगांव
श्री मोरेश्वर
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी
यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व
आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कर्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे.
श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या
भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील
बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७०
कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी.
अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक
वाहतुकीची सोय आहे.
0 comments:
Post a Comment