श्री महागणपतीची कथा

फार प्राचीन काळी गृत्समद नावाचा एक थोर ज्ञानी अनेक विद्यांत पंडित असा ऋषी होऊन गेला. तो थोर गणेशभक्त होता. एकदा त्याच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला. गृत्समदाने त्याला आपले पुत्र मानले. 'मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादांक्रांत करून इंद्रालाही जिंकेन' असे तो मुलगा म्हणाला. मग गृत्समदाने त्याला 'गणानां त्वा' या गणेशमंत्राचा उपदेश केला. त्या मुलाने वनात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. त्याच प्रमाणे त्याला लोखंड, रूपे व सुवर्ण यांची तीन नगरेही दिली. 'या त्रिपुरांचा नाश भगवान शिवशिवाय कोणीही करणार नाही. भगवान शिव एकाच बाणाने या त्रिपुरांचा संहार करील व तुलाही मुक्ती मिळेल' असा वर गणेशाने दिला म्हणून तो मुलगा त्रिपुरासुर या नावाने प्रसिद्ध झाला.
गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्याने अवघ्या त्रैलोक्याला त्राही भगवन करून सोडले. त्याने सर्व देवांनाही जिंकले. तेव्हा सर्व देव भगवान शिवाला शरण गेले. त्रिपुरासुराचा वध करण्याचे शंकराने आश्वासन दिले. मग भगवान शिव त्रिपुरासुराच्या वधासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासुराचे व शिवाचे घनघोर युद्ध झाले; पण शिवाला त्रिपुरासुर आवरेना. तेव्हा नारदांनी त्यांना भेटून सांगितले की, 'युद्धारंभी आपण विघ्नहारी गणेशाचे स्मरण केले नाही' म्हणून विजय मिळाला नाही. मग नारदांनी शंकराला 'प्रणम्य शिरसा देव' हे प्रसिद्ध अष्टश्लोकात्मक स्तोत्र सांगितले. शंकरांनी त्या स्तोत्राने गणेशाची आराधना केली असता त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला व 'मीच गणेश' असे सांगून वर मागण्यास सांगितले. त्रिपुरासुरावर विजय मिळावा असा वर शिवाने मागितला. तेव्हा गणेशाने प्रकट होऊन वर दिला व या स्थानाला लोक मणिपूर (रांजणगाव) म्हणतील असे सांगून गणेश अदृश्य झाला.
मग शिवाचे व त्रिपुरासुराचे प्रचंड युद्ध झाले व शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरांचा व त्रिपुरासुराचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली; म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात. त्रिपुरासुराबरोबरील युद्धात यश मिळावे म्हणून भगवान शंकराने या ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना व आराधना केली; तोच हा मणिपूरचा रांजणगावचा श्री महागणपती .

रांजणगाव

श्री महागणपती

श्री महागणपती
अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की – त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरारीवदे महागणपती असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.
हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment